मुंबई (यवतमाळ लाईव्ह न्यूज): राज्यातील महसूल सेवकांच्या रखडलेल्या मागण्यांबाबत सरकारने अखेर सकारात्मक पावलं उचलली आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सेवकांना तलाठी पदांच्या भरतीत विशेष प्राधान्य देण्याची हमी दिली आहे. त्यामुळे या सेवकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
महसूल सेवकांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्षपद महसूलमंत्री बावनकुळे यांनी भूषवले. यात सेवकांना चतुर्थ श्रेणीमध्ये सामावून घेऊन त्यांना मानधनाऐवजी नियमित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी चर्चिली गेली. मात्र, विद्यमान नियमांनुसार हे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
त्याऐवजी एक पर्याय म्हणून तलाठी भरतीत या सेवकांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव पुढे आला. मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, ज्या सेवकांकडे किमान पाच वर्षांचा अनुभव आहे, त्यांना भरती प्रक्रियेत २५ अतिरिक्त गुण दिले जातील. तसेच, त्यांच्या अनुभवाचा विचार करून काही जागा राखीव ठेवण्याचा विचार आहे. या प्रस्तावाला बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच याबाबतचा शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे.
यवतमाळमध्ये भाजपला मोठा धक्का: विजय चोरडिया यांनी घेतला शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
मंत्री बावनकुळे यांनी बैठकीत महसूल सेवकांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, या सेवकांच्या मानधनात आधीच वाढ करण्यात आली आहे आणि सरकार त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे.
बैठकीत एक मुद्दा असाही उपस्थित झाला की, पुराच्या काळात काही महसूल सेवक संपावर गेल्यामुळे प्रशासनाला त्रास सहन करावा लागला. तरीही, ऑनलाइन सेवांमुळे त्यांचे काम काहीसे कमी झाले असले तरी, त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्याच्या प्रशासनाला अधिक कार्यक्षम करण्यासाठी होईल. त्यामुळे सेवकांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहनही करण्यात आले.













1 thought on “तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य; काही जागा राखीव ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय”