मुंबई (यवतमाळ लाईव्ह न्यूज): ओला-उबरसारख्या खासगी कॅब सेवांमुळे प्रवाशांना भेडसावणाऱ्या जास्तीच्या चार्जेस, ड्रायव्हरांच्या उद्धट वागण्यापासून आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांपासून सुटका होण्याची वेळ आली आहे का? होय, असंच काहीतरी घडणार आहे. देशात पहिल्या सहकारी टॅक्सी सेवेचा श्रीगणेश होत असून, ‘भारत टॅक्सी’ नावाच्या या नव्या उपक्रमामुळे सामान्य माणसाच्या प्रवासाला नवं वळण मिळणार आहे. ही सेवा पूर्णपणे सरकारी पाठिंब्याने चालणारी असून, ड्रायव्हरांना मालकी हक्क देणाऱ्या या मॉडेलमुळे खासगी कंपन्यांच्या एकाधिकाराला आव्हान मिळेल.
‘भारत टॅक्सी’चा पायलट प्रकल्प नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६५० ड्रायव्हरांसह हा उपक्रम रुजवला जाईल, ज्यात महिलांसाठी ‘सारथी’ म्हणून संधी असतील. त्यानंतर डिसेंबरपासून हा प्रकल्प देशभरातील इतर राज्यांमध्ये पसरवला जाईल. सहकारिता मंत्रालय आणि राष्ट्रीय ई-गवर्नन्स विभागाच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या या सेवेचा उद्देश सामान्य ड्रायव्हरांना सक्षम बनवणे आणि प्रवाशांना विश्वासार्ह, परवडणारी वाहतूक देणे हा आहे. यासाठी सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेडशी भागीदारी झाली असून, ही संस्था सदस्यता आधारित मॉडेलद्वारे सेवा चालवेल – अगदी अमूलसारखंच.
या संस्थेची स्थापना जून महिन्यात ३०० कोटी रुपयांच्या भांडवलीसह झाली. संचालन समितीचे अध्यक्ष अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता असून, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे (एनसीडीसी) उपव्यवस्थापकीय संचालक रोहित गुप्ता उपाध्यक्ष आहेत. नवीन ‘भारत टॅक्सी’ अॅप नोव्हेंबरपासून उपलब्ध होईल, जे सुरुवातीला हिंदी, गुजराती, मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये येेल. डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत राजकोट, मुंबई आणि पुणे शहरांमध्ये सेवा सुरू होईल. त्यानंतर एप्रिल २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान लखनऊ, भोपाळ आणि जयपूरमध्ये विस्तार होईल. २०२७-२८ पर्यंत २० शहरांपर्यंत धावणारी ही सेवा २०२८ ते २०३० या काळात जिल्हा मुख्यालये आणि गावांपर्यंत पोहोचेल.
प्रवाशांसाठी या सेवेच्या खास वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं तर, ओला-उबरसारख्या प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या डायनॅमिक प्राईसिंग, पीक आवर्स चार्जेस किंवा हवामानानुसार वाढणाऱ्या भाड्यापासून पूर्ण सुटका मिळेल. येथे भाडे ठरलेलं आणि वाजबदार असेल, ज्यामुळे प्रवाशांना आर्थिक ओझं कमी होईल. सुरक्षिततेच्या बाबतीतही मोठी जबाबदारी घेतली जातेय. कॅबमध्ये पोलिस स्टेशनशी एकात्मिकता असेल आणि आपत्कालीन ‘डिस्ट्रेस बटण’ उपलब्ध असेल. याचा अर्थ, काही तरी गंभीर घडलं तर लाल बटण दाबल्यास जवळील पोलिस ठाण्याला तात्काळ माहिती मिळेल.
ड्रायव्हरांसाठी मात्र हा उपक्रम खऱ्या अर्थाने क्रांतिकारी आहे. कमीशनच्या जाचापासून मुक्ती मिळेल आणि प्रत्येक राइडची १०० टक्के कमाई ड्रायव्हरालाच मिळेल. त्याऐवजी दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक सदस्यता शुल्क भरावं लागेल. पहिल्या टप्प्यात १०० महिलांना ‘सारथी’ म्हणून संधी दिली जाईल, ज्यांची संख्या २०३० पर्यंत १५ हजारांपर्यंत वाढवली जाईल. असा हा सहकारी मॉडेल सामान्य माणसाला सक्षम बनवत प्रवासाच्या जगात नव्या वळणाची सुरुवात करणार आहे. ‘भारत टॅक्सी’ने ओला-उबरला खरी टक्कर देण्याची तयारी केली असून, सामान्यांचा हक्क वाढवणारा हा उपक्रम यशस्वी होण्याची अपेक्षा आहे.












