यवतमाळ लाईव्ह न्यूज: आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धानोरा तांडा भागात पोलिसांनी छापा टाकून एका शेतकऱ्याच्या शेतातून ११३ गांजाची झाडे जप्त केली. ही झाडे कापूस आणि तुरीच्या पिकांच्या ओळींमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. या प्रकरणी प्रदीप पांडू आडे (वय ३४) या शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून, जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे २ लाख ९४ हजार रुपये इतकी आहे.
मंगळवारी दुपारी साधारण २ वाजता आर्णी, दारव्हा आणि यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवली. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी शेताची पाहणी केली असता कापूस आणि तुरीच्या ओळींमध्ये गांजाची झाडे लावलेली आढळली आणि ती तात्काळ जप्त करण्यात आली.
अटक केलेल्या प्रदीप आडे याच्यावर आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धाड सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, पवन राठोड, योगेश गटलेवार, मिथुन जाधव, अजय डोळे, सोहेल मिर्झा, निलेश राठोड, किशोर झेंडेकर, अमित झेंडेकर आणि अशोक टेकाळे यांच्या पथकाने यशस्वी केली.
गेल्या १५ दिवसांत ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. यापूर्वी महागाव तालुक्यातील नगरवाडी शेतशिवारात स्थानिक गुन्हे शाखेने कापूस पिकात लपवलेला गांजा जप्त करून १ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्या वेळीही संबंधित शेतकऱ्याला अटक करण्यात आली होती. अल्पकाळात झालेल्या या दोन कारवायांमुळे पोलीस यंत्रणेची सतर्कता अधोरेखित होते.
वडिलांनी केलेला मालमत्ता करार मुलगा १८ वर्षांचा झाल्यावर रद्द करू शकतो’ सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
विदर्भातील ग्रामीण भागात कापूस किंवा तूर यांसारख्या पारंपरिक पिकांमध्ये गांजा लागवड करण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. शेतीतील आर्थिक अडचणी आणि गांजाला मिळणारी काळ्या बाजारातील मागणी यामुळे काही शेतकरी अशा बेकायदेशीर मार्गाकडे वळतात, असे पोलीस अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे.











