यवतमाळ लाईव्ह न्यूज: चंदीगडमधील एका प्रसिद्ध उद्योजकाने यंदाच्या दिवाळीला आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना चक्क ५१ नव्या कोऱ्या आलिशान कार भेट म्हणून दिल्या आहेत. या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या उद्योजकाने आपल्या टीमबद्दल बोलताना सांगितले की, माझी टीमच माझ्या यशाची खरी शक्ती आहे.
चंदीगडचे एम. के. भाटिया हे फार्मा क्षेत्रातील जाणकार उद्योजक आहेत. त्यांनी दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एकूण ५१ आलिशान कार वाटप केल्या. ही परंपरा ते सलग तिसऱ्या वर्षी पाळत आहेत. यावेळी त्यांनी ५१ कार देऊन या परंपरेला नवे रूप दिले आहे. या कार कर्मचाऱ्यांच्या पदक्रम आणि कामगिरीनुसार वाटण्यात आल्या. भाटिया यांनी केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर काही सहकाऱ्यांना आणि सेलिब्रिटी मित्रांनाही या लग्झरी कार भेट दिल्या, ज्यामुळे सर्वजण थक्क झाले.
जेव्हा कर्मचाऱ्यांनी शोरूममधून नव्या गाड्यांच्या चाव्या हाती घेतल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहिला नाही. त्यानंतर सर्वांनी मिळून एक ‘कार गिफ्ट रॅली’ काढली. या रॅलीने शहरातील रस्त्यांवरून जाताना सर्वांचे लक्ष वेधले. सजवलेल्या गाड्यांचा हा ताफा पाहून लोक मोबाईल काढून व्हिडिओ रेकॉर्ड करत होते.
अनेकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, दरवर्षी इतक्या महागड्या गाड्या भेट म्हणून का वाटल्या जातात? यावर भाटिया यांनी सांगितले की, ‘माझे सहकारीच माझ्या फार्मा कंपन्यांची खरी ताकद आहेत. त्यांची कष्टाळू वृत्ती आणि प्रामाणिकपणा हेच यशाचे मूळ आहे. त्यांना सन्मानित करणे आणि प्रेरित ठेवणे हे माझे कर्तव्य आहे.’ ते पुढे म्हणाले की, हे फक्त भेट नाही, तर टीमला उत्साहित करण्याचा आणि त्यांचे आभार मानण्याचा एक मार्ग आहे. भाटिया हे फार्मा उद्योगात बरेच वर्षे कार्यरत आहेत आणि अशा प्रकारच्या उदार कृतींमुळे ते नेहमीच चर्चेत राहतात.












