यवतमाळ लाईव्ह न्यूज: यवतमाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसच्या शहर, तालुका आणि जिल्हा युवक काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन-कापूस होळी आंदोलन झाले. शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेवरून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक होळी करून सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
जिल्ह्यात नाफेडमार्फत सोयाबीनची हमीभावाने खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावात मोठा तोटा सहन करावा लागत आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने परदेशातून कापसाची आयात वाढवल्याने देशांतर्गत बाजारात कापसाचे भाव कोसळले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपला आवाज बुलंद केला.
आंदोलनात आमदार बाळासाहेब मांगुळकर, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रा. डॉ. बबलू उर्फ अनिल देशमुख, तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश भीसनकर, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रमुख बगाडे, बाजार समिती सभापती रवी ढोक, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष जाफर खान, सोशल मीडिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके, शेतकरी नेते प्रा. पंढरी पाठे, अशोक भुतडा, बाळू निवलं, सचिन मनवर, कपील लांजेवार, ॲड. सीमा तेलंगे, प्रमोदिनी रामटेके, पल्लवी रामटेके यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
प्रा. देशमुख म्हणाले, “केंद्र सरकारचे धोरण हे पूर्णपणे व्यावसायिकांच्या फायद्याचे आहे. शेतकऱ्यांचे हित त्यात नाही. उलट त्यांच्या जगण्यावरच घाला घालणारे आहे. सरकारने तात्काळ हमीभाव खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.” शेतकऱ्यांनी सरकारकडे खरेदी प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी केली.











